बेळगाव :
ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक क्रीडा दिन दि. 18 डिसेंबर 2025 रोजी शाळेच्या क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राजू भातकांडे (नगरसेवक, प्रभाग क्रमांक 16), सन्माननीय पाहुणे जयदेव मनोहर देसाई (शाळा सदस्य) तसेच शाळेचे सचिव संजीव नेगिनाळ उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा दिनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या प्राचार्या अश्विनी चंद्रशेखर यांनी उपस्थितांचे स्वागत करून विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासासाठी क्रीडांचे महत्त्व विशद केले. त्यानंतर शाळेच्या चारही हाऊसच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व प्रभावी संचलन सादर केले. संचलनातून विद्यार्थ्यांची शिस्त, संघभावना व आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून आला. प्रमुख पाहुण्यांनी संचलनाची सलामी स्वीकारत विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.
क्रीडा दिनानिमित्त विविध वयोगटांसाठी धावण्याच्या शर्यती, रिले शर्यत, लांब उडी, फुटबॉल, क्रिकेट तसेच मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत उत्कृष्ट क्रीडावृत्तीचे दर्शन घडवले. याशिवाय शिक्षकांसाठी आयोजित विशेष खेळांनी कार्यक्रमात आनंदाची भर घातली.
कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने करण्यात आला. संपूर्ण क्रीडा महोत्सव अत्यंत यशस्वी ठरला असून विद्यार्थ्यांसह उपस्थितांसाठी हा सोहळा अविस्मरणीय ठरला. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी क्रीडा शिक्षक प्रज्वल अनोजी तसेच ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व शिक्षकवर्गाने विशेष परिश्रम घेतले.
