बेळगाव : श्री गणेश फेस्टिव्हल, बेळगाव या मान्यवर संस्थेतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या समाजाभिमुख व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात येणारा “नवरत्न सत्कार” सोहळा यंदा २२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ वाजता श्रीमाता सोसायटी सभागृह, न्यूगुडशेड रोड, बेळगाव येथे उत्साहात पार पडला.
यावेळी “सामाजिक संस्था” या गौरवशाली पुरस्कारासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान, बेळगाव ची निवड करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्गसंवर्धन, गड-जागृती तसेच सामाजिक कार्याच्या माध्यमातून सातत्याने योगदान देणाऱ्या या संस्थेच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
हा पुरस्कार मिळणे ही केवळ दुर्गवीर प्रतिष्ठान ची शान नसून, संस्थेला साथ देणाऱ्या प्रत्येक दुर्गप्रेमी, कार्यकर्ते, मार्गदर्शक आणि शुभेच्छकांचा सन्मान असल्याचे प्रतिष्ठानकडून सांगण्यात आले. समाजाकडून मिळालेली ही मोठी दाद व प्रेरणा भविष्यातील कार्य अधिक जोमाने आणि समर्पणाने करण्यासाठी बळ देणारी असल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या सोहळ्यास मान्यवर, गडप्रेमी आणि समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.