बेळगाव (प्रतिनिधी) कॅपिटल वन सोसायटीच्या सांस्कृतिक दालनातर्फे मानाच्या कॅपिटल वन करंडकासाठी आयोजित करण्यात येणारी १४ वी एकांकिका स्पर्धा येत्या २० व २१ डिसेंबर २०२५ रोजी लोकमान्य रंगमंदिर, बेळगांव येथे पार पडणार असून, या स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.
स्पर्धेतील दर्जा व रंजकता कायम राखण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून संघांची निवड आभासी पद्धतीने करण्यात येत आहे. यंदाही अनेक संघांनी सहभागासाठी नोंदणी केली होती. त्यातून निवडक व दिग्गज संघांची छाननी करून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांची अंतिम निवड करण्यात आली असून, त्यामुळे यंदाची स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे.
परिसरातील समृद्ध नाट्यपरंपरेची जाण ठेवत आणि उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने संस्थेने बेळगांव जिल्हा मर्यादित शालेय गटासाठीही स्वतंत्र एकांकिका स्पर्धा आयोजित केली आहे. या शालेय गटाला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, स्थानिक बालकलाकारांना आपल्या कलेचा आविष्कार सादर करण्याची उत्तम संधी मिळणार आहे.
बेळगांवकर नाट्यरसिकांनी नेहमीप्रमाणे रंगकर्मींना भरभरून दाद देत या स्पर्धा यशस्वी कराव्यात, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत स्थानिक बालनाट्य (एकांकिका) स्पर्धा पार पडतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता आंतरराज्य एकांकिका स्पर्धेला सुरुवात होईल.
प्रवेश निशुल्क :
नाट्यरसिकांसाठी प्रवेश पूर्णतः निशुल्क ठेवण्यात आला आहे. मात्र प्रयोगादरम्यान कोणत्याही संघाला व्यत्यय येऊ नये, यासाठी प्रयोग सुरू असताना सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व रसिकांनी नोंद घ्यावी, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
