बेळगाव :
चेन्नई येथे आंतरराष्ट्रीय एशिया पॅसिफिक डाऊन सिंड्रोम फेडरेशनच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत भारतासह इतर दहा देशांतील जलतरणपटूंनी सहभाग नोंदविला होता. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत बेळगावचा जलतरणपटू मयांक हलदर याने भारताचे प्रतिनिधित्व करताना उल्लेखनीय कामगिरी करत दोन सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले.
मयांक हलदर याने ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदक तर २५ मीटर बॅक स्ट्रोक प्रकारातही सुवर्णपदक पटकावून बेळगावचे नाव संपूर्ण देशात तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल केले. त्याच्या या अभिमानास्पद यशाबद्दल आबा स्पोर्ट्स क्लब, हिंदी स्पोर्ट्स क्लब व क्रीडा भारती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव रेल्वे स्थानकावर त्याच्या आगमनावेळी जंगी सत्कार करण्यात आला.
या सत्कारप्रसंगी मयांकचे आई-वडील उपस्थित होते. तसेच आबा स्पोर्ट्स क्लबचे जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांच्यासह विशाल वेसने, शुभांगी मंगळूरकर, ज्योती पवार, सुधीर धामणकर, मोहन पत्तार, सूर्यकांत हिंडलगेकर, पद्मप्रसाद हुली, गणेश दडीकर, हर्षाली पाटील, अनंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
सर्व उपस्थितांनी मयांकच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून, भविष्यात तो देशासाठी आणखी पदके जिंकून देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
