बेळगाव :
नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर रोजी शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी बेळगाव पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्याचा निर्धार केला आहे. यासाठी चार डीएसपी, 24 पीआय, 34 पीएसआय, 89 अधिकारी, 660 सीएचसी/सीपीसी, 300 होमगार्ड, सात सीएआर आणि तीन केएसआरपी तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.
यावेळी ड्रिंक अँड ड्राईव्ह, सीटबेल्ट न घालता वाहन चालवणे तसेच हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्यांवर विशेष मोहीम राबवली जाणार आहे. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांकडून 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी ॲम्बुलन्स व अग्निशामक दलही सज्ज ठेवण्यात येणार आहे.
शहरातील सुरक्षेसाठी बॉडी कॅमेरा, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सतत नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, 26 डिसेंबर रोजी बेळगाव शहरातील हॉटेल व रेस्टॉरंट चालक-मालकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नियमाप्रमाणे वयोमर्यादेअंतर्गत नसलेल्या मुलांना बार व रेस्टॉरंटमध्ये मद्यपान करण्यास मनाई असेल तसेच त्यांना लॉजमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
फटाके वाजवण्यात येणाऱ्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश व निर्गमनासाठी स्पष्ट फलक लावणे बंधनकारक करण्यात आले असून, कोणतीही अप्रिय घटना घडल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे सर्व आदेश बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयामार्फत जारी करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
