चव्हाट गल्लीतील अनंत (पपू) बामणे यांचा प्रामाणिकपणा; १० हजार रुपये आणि महत्त्वाची मूळ कागदपत्रे सुरक्षित परत मिळाल्याने सुधीर मुरगोडकर यांना दिलासा
बेळगाव : प्रतिनिधी
आजच्या धावपळीच्या जगात माणुसकी आणि प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय बेळगावमध्ये आला आहे. बापट गल्ली येथील सुधीर मुरगोडकर यांचे हरवलेले पाकीट शोधून त्यातील रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षितपणे परत करून चव्हाट गल्ली येथील अनंत (पपू) बामणे यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे.
सुधीर मुरगोडकर हे बेंगळुरूला जात असताना झालेल्या गडबडीत त्यांचे पाकीट समादेवी गल्ली परिसरात हरवले होते. या पाकिटात १० हजार रुपये रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच इतर महत्त्वाची मूळ कागदपत्रे होती. पाकीट हरवल्याने मुरगोडकर यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली होती.
दरम्यान, चव्हाट गल्ली येथील शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष अनंत (पपू) बामणे यांना हे पाकीट सापडले. पाकीट स्वतःकडे ठेवण्याऐवजी त्याच्या मालकाचा शोध घेऊन ते परत करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यासाठी त्यांनी निलेश शहापूरकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर भाऊ किल्लेकर यांच्या मदतीने सुधीर मुरगोडकर यांच्याशी फोनवर संपर्क साधण्यात आला. खात्री केल्यानंतर मुरगोडकर यांना त्यांचे पाकीट परत करण्यात आले.
पाकिटातील १० हजार रुपये आणि सर्व महत्त्वाची मूळ कागदपत्रे सुरक्षित परत मिळाल्याने सुधीर मुरगोडकर यांना मोठा दिलासा मिळाला. अनंत (पपू) बामणे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
पैशांपेक्षा माणुसकी मोठी असते, हे अनंत (पपू) बामणे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे. पाकिटाच्या मालकाचा शोध घेण्यासाठी सहकार्य करणारे निलेश शहापूरकर आणि भाऊ किल्लेकर यांचे योगदानही महत्त्वाचे ठरले.
प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे आणि माणुसकी आजही टिकून आहे, याची जाणीव करून देणारी ही घटना समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
