अँड्रॉइड फोनमध्ये गेल्या काही दिवसांत अनेकांना कॉलिंग डायलर अचानक बदलल्याचे जाणवले आहे. फोन ॲपचा लेआउट पूर्णपणे वेगळा दिसू लागला आहे. विशेष म्हणजे ही सुधारणा कोणत्याही साध्या ॲप अपडेटद्वारे आलेली नाही, तर गुगलने सर्व्हर साईट अॅक्टिवेशन द्वारे थेट लागू केली आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना “अपडेट उपलब्ध” असा संदेश न येताच हा बदल आपोआप फोनवर दिसू लागला.
नवीन Material 3 Expressive डिझाइन अंतर्गत आता होम टॅबमध्येच कॉल हिस्ट्री आणि कॉन्टॅक्ट्सची यादी एकत्र दिसते. आधी “Favorites”, “Recents”, “Contacts”, “Voicemail” असे वेगवेगळे टॅब्स होते, मात्र आता ते कमी करून फक्त तीन टॅब ठेवले आहेत – Home, Keypad आणि Voicemail. होम पेजवर वरच्या बाजूला तुमचे महत्त्वाचे कॉन्टॅक्ट्स (स्टार केलेले) carousel स्वरूपात दिसतात आणि त्याखाली सर्व कॉल लॉग दिसतो. यामुळे कॉल रेकॉर्ड्स आणि कॉन्टॅक्ट्स शोधणे सोपे झाले आहे.
Keypad विभागालाही नवे स्वरूप मिळाले आहे. आधी कॉल स्क्रीनवरच फ्लोटिंग बटण होते, पण आता कीपॅड स्वतंत्र टॅबमध्ये आहे. डिझाइन गोलसर आणि आकर्षक दिसते. याचबरोबर इन-कॉल इंटरफेसमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. कॉल चालू असताना वापरायची सर्व बटणे आता पिल-शेपमध्ये दिसतात, तर End Call बटण मोठे करून अधिक स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्वात लक्षवेधी बदल म्हणजे कॉल रिसीव किंवा डिसकनेक्ट करण्याची पद्धत. यापुढे वापरकर्त्यांना दोन पर्याय मिळणार आहेत – कॉल स्वीकारण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी पारंपरिक स्वाईप जेस्चर वापरता येईल किंवा थेट टॅप बटण दाबता येईल. काहींना स्वाईप करणे सोयीचे वाटते तर काहींना टॅप करणे. त्यामुळे दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच, इनकमिंग कॉल स्क्रीनवर कॉन्टॅक्टचा फोटो किंवा अवतार फिरत्या (rotate होणाऱ्या) स्वरूपात दिसतो, ज्यामुळे अनुभव अधिक आकर्षक होतो.
या बदलांबरोबरच Google Contacts अॅप देखील नवे रूप घेते आहे. प्रत्येक कॉन्टॅक्ट आता रंगीत बॉक्समध्ये दिसतो आणि कॉल, मेसेज, ई-मेल यांसारख्या क्रिया मोठ्या पिल-शेप बटणांतून करता येतात. शिवाय गुगल “Calling Cards” नावाचे एक नवे फिचर टेस्ट करत आहे, ज्यामुळे कॉल येताना कॉन्टॅक्टचा फोटो पूर्ण स्क्रीनवर iOS प्रमाणे दिसेल.
वापरकर्त्यांची प्रतिक्रिया या अपडेटवर मिश्रित आहे. काहींना नवीन डिझाइन आकर्षक आणि सोपे वाटते, तर काहींना जुना लेआउट जास्त पसंत होता. Reddit आणि सोशल मीडियावर अनेकांनी “नवीन डायलर गोंधळलेला वाटतो” अशी टिप्पणी केली आहे. ज्यांना हा बदल आवडत नाही, त्यांनी अॅपचे अपडेट अनइन्स्टॉल करून किंवा ऑटो अपडेट थांबवून जुन्या स्वरूपाकडे परत जाण्याचा पर्याय ठेवता येईल.
गुगलचे हे बदल फक्त Phone अॅपपुरते मर्यादित नाहीत. Gmail, Photos आणि Contacts सारख्या इतर ॲप्समध्येही येत्या काळात Material 3 डिझाइननुसार अपडेट्स दिसतील. त्यामुळे पुढील काही महिन्यांत अँड्रॉइडचा संपूर्ण लूक अधिक साधा, रंगीत आणि वापरकर्त्याभिमुख होण्याची शक्यता आहे.