आषाढी एकादशीनिमित्त श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनतर्फे आयोजित भक्तीरसपूर्ण “अभंगवाणी” कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. स्वरांजलीचे गायक विनायक मोरे आणि अक्षता मोरे यांच्या सुश्राव्य गायनाने उपस्थित रसिक श्रोते भारावून गेले. त्यांना सिंथेसायझरवर संतोष पुरी, तबल्यावर नारायण गणाचारी व ऑक्टोपॅडवर स्नेहल जाधव यांनी अप्रतिम साथसंगत दिली.
प्रारंभी श्री विठ्ठल-रखुमाई प्रतिमेचे पूजन प्रकाश मरगाळे यांच्या हस्ते करण्यात आले. मालोजीराव अष्टेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. डॉ. दत्तप्रसाद गिजरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व विठ्ठल-रखुमाईची सुंदर मूर्ती देऊन विनायक मोरे आणि अक्षता मोरे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
त्यानंतर दोन तास उत्तरोत्तर रंगत गेलेल्या अभंग संगीत मैफलीत संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत कान्होपात्रा, संत विष्णुदास, संत तुलसीदास, संत पुरंदरदास, संत मीराबाई आदि अनेक संतांनी रचलेले प्रसिद्ध अभंग तसेच भक्तिगीते प्रस्तुत करुन विनायक मोरे व अक्षता मोरे यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ओंकार स्वरूपा, गाईये गणपती, रूप पाहता लोचनी, हरि आला रे, आधी रचिली पंढरी, वैकुंठाहुनी आलो आम्ही, माझी रेणुका माऊली, देवाचिये द्वारी, माझे माहेर पंढरी, श्री रामचंद्र कृपालू भजमन, खेळ मांडियेला, विठू माऊली तू, समचरणी उभा चैतन्याचा गाभा, पायोजी मैने, बोलावा विठ्ठल, अबीर गुलाल, नारी नयन चकोरा, जयदेव जयजय शिवराया, कर कटावरी ठेऊनी, माऊली माऊली आदि सुमधुर रचनांचे अप्रतिम सादरीकरण करण्यात आले. अनेक गीतांनी वनस्मोअर मिळविला. कार्यक्रमास रसिकश्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. प्रवीण प्रभू यांनी ध्वनी संयोजन केले. मालोजीराव अष्टेकर यांनी आभार मानले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन आयोजित “अभंगवाणी”ला उत्स्फूर्त दाद
