सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी कुंदानगरी सज्ज!

सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी कुंदानगरी सज्ज!

बिर्ला इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आयोजन; देश-विदेशातील १२०० हून अधिक अव्वल स्केटर्सचा सहभाग

बेळगाव : बेळगावमध्ये प्रथमच भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणाऱ्या सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी कुंदानगरी सज्ज झाली आहे. बिर्ला इंटरनॅशनल स्कूल आणि ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल यांच्या पुढाकाराने तसेच बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १६ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत शिवगंगा स्पोर्ट्स क्लबच्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंकवर या स्पर्धा पार पडणार आहेत. तर रोड स्केटिंगच्या स्पर्धा बीएसएनएल कार्यालयासमोरील रस्त्यावर आयोजित करण्यात येणार आहेत.

या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत संपूर्ण देशातून मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी होणार आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य विभागांतून तसेच देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमधील स्पर्धकांचा सहभाग अपेक्षित आहे. याशिवाय गल्फ विभागातून दुबई, सौदी अरेबिया, ओमान, कतार, यूएई, बहरीन, शारजा, येमेन आणि कुवेत येथील खेळाडूही सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी देश-विदेशातून सुमारे १२०० हून अधिक अव्वल स्केटिंगपटू बेळगावमध्ये दाखल होणार आहेत.

स्पर्धेची तयारी बिर्ला इंटरनॅशनल स्कूलचे मनजीत जैन यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्यात आली आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी २० अधिकृत पंच, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे १५ प्रशिक्षक, शाळेचे २० शिक्षक, दोन डॉक्टर आणि १२ जणांचा सपोर्ट स्टाफ कार्यरत राहणार आहे.

या भव्य स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळूरकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, सोहम हिंडलगेकर, स्वरूप पाटील, शल्य तारळेकर यांच्यासह बिर्ला इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक, कर्मचारी आणि इतर अनेक जण परिश्रम घेत आहेत.

देश-विदेशातील नामवंत स्केटिंगपटूंच्या सहभागामुळे बेळगावच्या क्रीडा क्षेत्राला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्याची संधी निर्माण झाली असून, या स्पर्धेमुळे बेळगावच्या क्रीडा वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × 4 =

error: Content is protected !!