बेळगाव : एक नोव्हेंबर राज्योत्सव दिनाच्या पार्श्वभूमीवर तसेच त्यानंतरही बेळगावमध्ये काही कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून मराठी-कन्नड वाद निर्माण करून मराठी भाषेवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे. या प्रकारांना आळा घालण्याच्या मागणीसाठी समितीचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीने दरवर्षीप्रमाणे यंदाही एक नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या विरोधात काळा दिन अत्यंत गांभीर्याने आणि शांततेत पाळला. या माध्यमातून सीमाभागातील मराठी जनतेच्या तीव्र भावना देशवासीयांसमोर मांडण्यात आल्या. यंदा युवकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत आपली ताकद दाखवून दिली.
अशा परिस्थितीत पुन्हा मराठी जनतेला डिवचण्याचे आणि भाषिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समितीचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर मराठी जनतेच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती पुढाकार घेणार आहे.
यासाठी शुक्रवार, दिनांक ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे मराठी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
