नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची राज्यस्तरावर दखल; ‘आयडॉल शिक्षक’ सन्मानासाठी निवड झाल्याबद्दल सहकाऱ्यांकडून गौरव
चंदगड : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT) यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘आयडॉल शिक्षक’ सन्मानासाठी निवड झाल्याबद्दल दि. न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथील सहाय्यक शिक्षक संजय गोपाळ साबळे यांचा चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने सपत्नीक सत्कार करून गौरव करण्यात आला.
संजय साबळे यांनी आपल्या अध्यापन कार्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. केवळ पाठ्यपुस्तकीय ज्ञानापुरते अध्यापन मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती, वक्तृत्व, लेखनकौशल्य, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव विकसित व्हावी, यासाठी ते सातत्याने विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करणे, त्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढविणे हा त्यांच्या अध्यापनाचा मुख्य उद्देश राहिला आहे. त्यांच्या विद्यार्थी केंद्रित आणि प्रयोगशील शैक्षणिक कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली असून, त्यांची ‘आयडॉल शिक्षक’ सन्मानासाठी निवड झाली आहे.
यावेळी कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे संचालक एम. एन. शिवणगेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शिक्षकाचे खरे यश विद्यार्थ्यांच्या प्रगतीत आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात दडलेले असते. संजय साबळे यांनी अध्यापनाबरोबरच साहित्य, वाचन चळवळ आणि विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची आवड निर्माण केली आहे. त्यांना मिळालेला आयडॉल शिक्षक सन्मान हा त्यांच्या सातत्यपूर्ण, निष्ठापूर्ण आणि कल्पक कार्याचा गौरव आहे.
चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे समन्वयक रविंद्र पाटील यांनी शिक्षकांनी काळानुसार स्वतःमध्ये आणि अध्यापन पद्धतीमध्ये बदल स्वीकारण्याची गरज व्यक्त केली. संजय साबळे हे अध्यापन, साहित्यनिर्मिती आणि विद्यार्थी विकास या तिन्ही क्षेत्रांत सक्रियपणे कार्यरत असून, त्यांच्या कार्यामुळे चंदगड तालुक्याच्या शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्राचा गौरव वाढला आहे. त्यांचा हा सन्मान तालुक्यातील शिक्षकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
सत्काराला उत्तर देताना संजय साबळे यांनी हा सन्मान केवळ आपला नसून शाळा, सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक प्रवासात मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचा असल्याची भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे, त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि त्यांना आत्मविश्वासाने जीवनाला सामोरे जाण्यास सक्षम बनविणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. सहकाऱ्यांनी केलेला हा प्रेमपूर्ण सत्कार अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या सत्कार समारंभाला केंद्रप्रमुख आप्पाराव पाटील, सौ. अश्विनी पाटील, संध्या साबळे, रविंद्र पाटील, महादेव शिवणगेकर, मोहन पाटील, आनंद पाटील, बाबूराव पाटील, हणमंत पाऊसकर, संजय पाटील, राजेंद्र शिवणगेकर, कमलेश कर्निक यांच्यासह मराठी अध्यापक संघाचे पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते.
संजय साबळे यांच्या या सन्मानाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
