ज्योती सेंट्रल स्कूलचे राष्ट्रीय समूहगीत स्पर्धेत घवघवीत यश; दक्षिण भारत विभागात द्वितीय क्रमांक

ज्योती सेंट्रल स्कूलचे राष्ट्रीय समूहगीत स्पर्धेत घवघवीत यश; दक्षिण भारत विभागात द्वितीय क्रमांक

चेन्नई येथे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते विजेत्या संघाचा गौरव; विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल बेळगावात अभिनंदनाचा वर्षाव

बेळगाव : दक्षिण भारत विभागीयस्तरीय राष्ट्रीय समूहगीत स्पर्धेत दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूलने द्वितीय क्रमांक पटकावत बेळगावच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. भारत विकास परिषदेतर्फे तामिळनाडूतील चेन्नई येथे आयोजित या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट समूहगीत सादरीकरण करत उल्लेखनीय यश संपादन केले.

या स्पर्धेतील विजेत्या संघाला तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते चषक आणि प्रशस्तीपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले.

ज्योती सेंट्रल स्कूलने यापूर्वी बेळगाव शाखास्तरीय समूहगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर सिंधनूर येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावत शाळेने दक्षिण भारत विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली होती. या यशस्वी वाटचालीत विद्यार्थ्यांनी चेन्नई येथेही आपली गुणवत्ता सिद्ध केली.

या विजयी समूहात कु. स्वरा जठार, अनिका हिरेमठ, ऋग्वेद कदम, तनय गिंडे, सोज्वल साखरे, अनमोल जाधव, आर्या राजण्णावर आणि समर्थ मठ या विद्यार्थ्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना शिक्षिका सौ. अक्षता मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या स्पर्धेसाठी बेळगावहून भारत विकास परिषदेचे बेळगाव शाखाध्यक्ष विनायक मोरे आणि कर्नाटक उत्तर प्रांताचे संघटन सचिव विनायक घोडेकर हेही विद्यार्थ्यांच्या संघासमवेत चेन्नई येथे उपस्थित होते.

ज्योती सेंट्रल स्कूलच्या एसएमसी कमिटीचे चेअरमन प्रा. आर. के. पाटील, व्हाइस चेअरमन प्रा. आर. एस. पाटील, सेक्रेटरी प्रा. नितीन घोरपडे, प्राचार्य प्रदीप पाटील आणि उपप्राचार्य मनोहर करडी यांनी विजयी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षिका अक्षता मोरे यांचे अभिनंदन केले.

भारत विकास परिषद, बेळगाव शाखेतर्फेही यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत मिळवलेल्या यशामुळे ज्योती सेंट्रल स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, विद्यार्थ्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × 5 =

error: Content is protected !!