बलभीम मराठी साहित्य संघाच्या बैठकीत निर्णय; संमेलनाच्या तयारीला लवकरच प्रारंभ
कुद्रेमानी : मराठी साहित्याची परंपरा जपण्याबरोबरच नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे २१ वे मराठी साहित्य संमेलन रविवार, दि. १३ डिसेंबर २०२६ रोजी कुद्रेमानी येथे आयोजित करण्यात येणार आहे. बलभीम मराठी साहित्य संघातर्फे होणाऱ्या या संमेलनाच्या आयोजनाचा निर्णय संघाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
बलभीम मराठी साहित्य संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक रविवारी रात्री साहित्य संघाच्या कार्यालयात पार पडली. संघाचे अध्यक्ष एम. बी. गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आगामी साहित्य संमेलनाच्या आयोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर २१ वे मराठी साहित्य संमेलन १३ डिसेंबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले.
बैठकीत संमेलनातील विविध साहित्यिक सत्रांचे नियोजन, संमेलनाध्यक्षांची निवड, व्याख्याते, कथाकार, कवी तसेच अन्य मान्यवर पाहुण्यांना निमंत्रित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. साहित्यरसिकांसाठी हे संमेलन पर्वणी ठरेल, अशा पद्धतीने दर्जेदार कार्यक्रमांची आखणी करण्यावर उपस्थितांनी भर दिला.
यावेळी नागेश राजगोळकर, जी. जी. पाटील, शिवाजी मुरकुटे, शांताराम गुरव, दत्ता कांबळे, महादेव गुरव, परशराम पाटील, अजित सुतार, प्रशांत सुतार, अनंत लोहार, शैलेश गुरव, उमेश गुरव, विशाल गुरव, मारुती पाटील, दीपक मराठे आणि विशाल हुलजी आदींनी संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध सूचना मांडल्या.
गेल्या अनेक वर्षांपासून साहित्यिक उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या बलभीम मराठी साहित्य संघातर्फे यंदाचे २१ वे संमेलनही उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात साजरे करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या संमेलनाच्या माध्यमातून मराठी साहित्यिक, कवी, लेखक आणि साहित्यप्रेमींना एकत्र आणण्यासोबतच मराठी भाषेच्या संवर्धनाला आणि साहित्यिक चळवळीला अधिक चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
