समृद्धी महामार्गावर काळा दिन पाळत कर्नाटक सरकारचा निषेध; ‘बेळगाव-कारवार-निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’च्या घोषणांनी परिसर दणाणला!

समृद्धी महामार्गावर काळा दिन पाळत कर्नाटक सरकारचा निषेध; ‘बेळगाव-कारवार-निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’च्या घोषणांनी परिसर दणाणला!

बेळगाव : प्रतिनिधी

सन १९५६ मध्ये झालेल्या भाषावार प्रांतरचनेत बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर आदी मराठीबहुल प्रदेश अन्यायाने कर्नाटक राज्यात समाविष्ट करण्यात आले. या निर्णयाचा निषेध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस ‘काळा दिन’ म्हणून पाळण्यात येतो.

यंदा काशी विश्वनाथ दर्शनासाठी परिवारासह उत्तर भारताच्या यात्रेवर गेलेल्या बेळगावातील मराठी बांधवांना १ नोव्हेंबर रोजी बेळगावात आयोजित निषेध फेरीत सहभागी होता आले नाही. मात्र, प्रवासादरम्यान समृद्धी महामार्गावरील देऊळगाव येथे त्यांनी प्रतीकात्मक स्वरूपात काळा दिन पाळून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविला.

यावेळी ‘बेळगाव-कारवार-निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, अशा जोरदार घोषणांनी समृद्धी महामार्गाचा परिसर दणाणून गेला. मराठीबहुल सीमाभाग महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा निर्णय हा मराठी जनतेवर झालेला अन्याय असून, सीमाप्रश्नाचा न्याय्य तोडगा अद्यापही प्रलंबित असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी अनिल पाटील यांनी सीमाभागातील मराठी जनतेला कर्नाटक सरकारकडून भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि अन्यायाबाबत आपले विचार मांडले. सीमाप्रश्नाचा न्याय्य निकाल लागून बेळगावसह मराठीबहुल सीमाभागाचा संयुक्त महाराष्ट्रात समावेश होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या प्रतीकात्मक निषेध आंदोलनात यल्लाप्पा सामाजी, कलाप्पा पाटील, ज्योतिबा मुतगेकर, राजाराम निलजकर, परशराम गुरव, गंगाराम पावटे, गोपाळ डोंणकरी, सुनील पाटील, सुभाष गवी, अनंत गरडे, सखाराम पाटील, चाळोबा भांदुर्गे, शंकर माळवे, श्री राजूकर, परशुराम पाटील, परशराम हदगल यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला.

सीमाप्रश्नाचा न्याय्य निकाल लागून मराठीबहुल सीमाभाग संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट होईपर्यंत मराठी जनतेचा लढा अविरत सुरूच राहील, असा ठाम निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five + 16 =

error: Content is protected !!