हिंडलग्यातील हेस्कॉम कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक; अधिकाऱ्यांना विचारला जाब
बेळगाव : प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील हिंडलग्यासह विविध गावांच्या शिवारात नादुरुस्त अवस्थेत असलेले ट्रान्सफॉर्मर तातडीने दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे. या मागणीसाठी मंगळवारी शेतकऱ्यांनी हिंडलग्यातील बॉक्साइट रोडवरील हेस्कॉम कार्यालयावर धडक देत संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली.
बेळगाव तालुक्यातील उचगाव, गोजगा, आंबेवाडी, मण्णूर आणि हिंडलग्यासह विविध गावांच्या शिवारात अनेक ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त अवस्थेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही दुरुस्ती होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
शेतीसाठी पाण्याची गरज असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. पिके वाळण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर तातडीने दुरुस्त करून वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
यावेळी आर एम चौगुले यांनी हेस्कॉम अधिकाऱ्यांना जाब विचारत ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीतील दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली. वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
बेळगाव तालुक्यातील अनेक शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत. प्रतिकूल हवामान आणि पाण्याच्या नियोजनातील अडचणींमुळे आधीच शेतकरी त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
यावेळी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, मनोहर राक्षे, अशोक यळगुकर, खाचो तरळे, परशराम सांबरेकर, बसवंत सांबरेकर, मारुती तरळे, लक्ष्मण सांबरेकर, रघुनाथ पावशे, संजय पाटील आणि आप्पाजी यळगुकर यांच्यासह विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करावेत आणि शेतीसाठी वीजपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
