बेळगाव – सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ, श्री राजा शिवछत्रपती युवक मंडळ, कोनवाळ गल्ली छत्रपती शिवाजी रोड यांच्या वतीने गुरुवार, दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वैद्यकीय समन्वयक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि मध्यवर्ती श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारी सचिव प्राचार्य आनंद अरुण आपटेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी व लक्ष्मण किल्लेकर यांचाही मंडळाच्या वतीने गौरव करण्यात आला.
मागील वर्षी ५ सप्टेंबर २०२४ रोजी कोनवाळ गल्लीतील प्रशांत हांडे याला किडनी ट्रान्सप्लांटची आवश्यकता होती. त्यावेळी प्रसारमाध्यमांतून मदतीचे आव्हान करण्यात आले होते. मुख्यमंत्री सहायता निधीतून २ लाख रुपयांची मदत तातडीने उपलब्ध करून दिल्यामुळे प्रशांत हांडे यांचे जीवन वाचले. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष अधिकारी व मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी पुढाकार घेतला होता. आज त्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असून हांडे यांची तब्येत सुधारली आहे आणि ते पुन्हा आपल्या नोकरीत कार्यरत झाले आहेत.
या प्रसंगी प्राचार्य आनंद आपटेकर यांनी विघ्नहर्त्याकडे प्रार्थना करताना सांगितले की, “अशा संकटांना कोणीही सामोरे जाऊ नये. मात्र आलेच तर आपण सर्वजण एकत्र येऊन रुग्णसेवा व मदतीसाठी सदैव तत्पर राहू.” त्यांनी समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, तज्ञ समिती अध्यक्ष खासदार धैर्यशील माने, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांचे विशेष आभार मानले.
या वेळी मंडळाचे अध्यक्ष विनायक पवार, मदन अष्टेकर, कुंज नावगेकर, महेश नावगेकर, कुणाल हांडे, आकाश हांडे, प्रदीप किल्लेकर, शिवम उरणकर, तसेच महिला मंडळ पदाधिकारी उपस्थित होते.