अध्यात्माची शक्ती आत्म्याच्या जाणिवेतून समजून घ्या : संजीव जाधव

अध्यात्माची शक्ती आत्म्याच्या जाणिवेतून समजून घ्या : संजीव जाधव

बेळगाव : “या जगातून दुसऱ्या जगात जाताना सोबत शरीर नेता येत नाही, तर त्या शरीरावर नियंत्रण ठेवणारा आत्माच जातो. म्हणजेच शरीर हे आत्म्याचे वाहन आहे,” असे प्रतिपादन संजीव जाधव उर्फ सुदर्शन प्रभू यांनी केले.

हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिरात शनिवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात ‘अध्यात्माची शक्ती’ या विषयावर ते बोलत होते.

यावेळी बोलताना जाधव म्हणाले की, सर्व जीवांमध्ये मनुष्य हा बुद्धिमान आणि जबाबदार प्राणी आहे. माणसाला जीवनात येणाऱ्या अनेक अडचणींचे मूळ अज्ञानात आहे. शरीर हे जसे त्रासाचे कारण ठरू शकते, तसेच ते आनंदाचेही माध्यम आहे. जोपर्यंत आपण भगवंताच्या सान्निध्यात आहोत, तोपर्यंत आनंदी राहू शकतो, ही बाब प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे.

हनुमंताच्या सामर्थ्याचा उल्लेख करताना ते म्हणाले की, हनुमंताला सामर्थ्य आणि शक्तीचे वरदान लाभले आहे. त्यामुळेच त्याला ‘महाबली’ असेही संबोधले जाते.

प्रभू श्रीरामांच्या बेळगाव भेटीविषयी सांगताना जाधव म्हणाले की, पंचवटी (नाशिक) येथून श्रीलंकेकडे जाताना प्रभू रामचंद्र बेळगावात आले होते. त्यांच्या पदस्पर्शाने कणबर्गीजवळील परिसर पावन झाला असून, हे ठिकाण ‘रामतीर्थ’ म्हणून ओळखले जाते. येथून पुढे प्रवास करताना प्रभू श्रीरामांना वाटेत शबरी भेटली, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे चिटणीस अनंत लाड यांच्या प्रास्ताविकाने व स्वागताने झाली. संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश माहेश्वरी यांच्या हस्ते संजीव जाधव यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. खजिनदार रघुनाथ बांदगी यांनी आभार मानले.

याप्रसंगी योगगुरू एस. बी. कुलकर्णी, देवकुमार बिरजे, एम. बी. घोरपडे, शंकरराव चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 5 =

error: Content is protected !!