हत्तरगी टोलनाक्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन; महामार्ग बंद, कोल्हापूर-सौंदत्तीला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय

हत्तरगी टोलनाक्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन; महामार्ग बंद, कोल्हापूर-सौंदत्तीला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय

बेळगाव : प्रतिनिधी

उसाला प्रति टन योग्य बाजारभाव मिळावा, या मागणीसाठी हत्तरगी टोलनाक्यावर कालपासून शेतकऱ्यांचे भव्य आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आल्याने वाहनचालकांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

सध्या दसरा उत्सवाचा काळ असल्याने सीमाभागातील अनेक भाविक कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर तसेच सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने जात आहेत. मात्र, हत्तरगी टोलनाक्याजवळ सुरू असलेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून भाविकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.

कोल्हापूर आणि सौंदत्तीकडे जाणाऱ्या भाविकांसह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा आणि प्रवासातील अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी मार्गाची माहिती घेऊन पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

बेळगावला पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग

कोल्हापूर – रंकाळा – गडहिंग्लज – नेसरी – कोवाड – उचगाव – हिंडलगा – बेळगाव असा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. हत्तरगी येथील महामार्गावरील वाहतुकीत अडथळा असल्यास वाहनचालक या मार्गाचा विचार करू शकतात.

उसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे दसऱ्याच्या काळात देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या प्रवासावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. आंदोलन आणि वाहतुकीबाबतच्या पुढील घडामोडींवर प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × 1 =

error: Content is protected !!