दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात महिषासुरमर्दिनी मूर्तीचा अनावरण सोहळा उत्साहात

दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात महिषासुरमर्दिनी मूर्तीचा अनावरण सोहळा उत्साहात

स्वच्छता दूत आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ माळी गल्लीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अनावरण व महाआरती

बेळगाव : प्रतिनिधी

श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिर येथे सोमवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता दक्षिणकाशीच्या महिषासुरमर्दिनी मूर्तीचा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या नेत्रदीपक आतषबाजीने उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

गणेशोत्सव काळात गणपती विसर्जनाच्या दोन्ही तलावांवर सलग तीन दिवस अहोरात्र स्वच्छता करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने त्यांच्या शुभहस्ते महिषासुरमर्दिनी मूर्तीचे अनावरण करण्यात आले. सॅनिटरी इन्स्पेक्टर आनंद पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्वच्छता दूतांनी ही स्वच्छता मोहीम यशस्वीपणे पार पाडली होती.

नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात आयोजित महाआरतीचा मान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माळी गल्लीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आला. हे मंडळ गेल्या सहा वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करत असून, यंदा आपल्या सार्वजनिक गणपतीचे सर्वप्रथम विसर्जन करून पर्यावरणपूरक उत्सवाचा आदर्श घालून दिला होता. या कार्याची दखल घेत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली.

मूर्तीचे अनावरण आणि महाआरतीनंतर कपिलेश्वर महादेव ट्रस्टच्या वतीने स्वच्छता दूत तसेच गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चव्हाट गल्लीतील प्रसिद्ध कलाकार प्रवीण राणे यांनी महिषासुरमर्दिनीची सुंदर मूर्ती साकारल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. तसेच आकर्षक विद्युत रोषणाई आणि उत्कृष्ट ध्वनियंत्रणा उपलब्ध करून दिल्याबद्दल पोगो साऊंडचे अभिजीत पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

या सोहळ्याला मंदिराचे अध्यक्ष राहुल कुरणे, विवेक पाटील, राजू भातखंडे, अभिजीत चव्हाण, अजित जाधव, दौलत साळुंखे, अनिल मुतकेकर, प्रथमेश कावळे, ज्योतिबा कावळे यांच्यासह मंदिराचे सर्व सेवेकरी आणि महिला सेवेकरी उपस्थित होते.

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सेवाभावाचा सन्मान, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा गौरव आणि धार्मिक परंपरेचा संगम घडवून आणणारा हा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen − 10 =

error: Content is protected !!