भारतीय हॉकीच्या दुहेरी सुवर्णविजयाचा बेळगावात विजयोत्सव

भारतीय हॉकीच्या दुहेरी सुवर्णविजयाचा बेळगावात विजयोत्सव

बेळगाव | बेधडक बेळगाव वृत्तसेवा

एशियन गेम्स २०२६ मध्ये भारतीय हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी सुवर्णपदक पटकावले. या ऐतिहासिक दुहेरी सुवर्णविजयानंतर बेळगावमध्येही हॉकीप्रेमींनी उत्साहात विजयोत्सव साजरा केला.

धर्मवीर संभाजी महाराज चौकात हॉकी बेळगावच्या वतीने हॉकीपटू आणि पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून भारतीय संघाच्या विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी मिठाई वाटून भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.

भारतीय महिला हॉकी संघाने अंतिम सामन्यात चीनचा १-० असा पराभव करत तब्बल ४४ वर्षांनंतर एशियन गेम्सचे सुवर्णपदक पटकावले. १९८२ नंतर भारतीय महिला संघाने प्रथमच या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

दुसरीकडे, भारतीय पुरुष संघाने अंतिम सामन्यात मलेशियाचा ५-१ असा पराभव करत सलग दुसऱ्यांदा एशियन गेम्सचे सुवर्णपदक पटकावले. या विजयासह भारताने पुरुष हॉकीतील आपले विजेतेपद कायम राखले.

यावेळी हॉकी बेळगावचे सचिव सुधाकर चाळके यांनी बेळगावला ऑलिम्पिक खेळाडूंची गौरवशाली परंपरा असल्याचे सांगितले. बेळगावमध्ये अद्ययावत अॅस्ट्रोटर्फ मैदानाची उभारणी झाल्यास येथून देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार हॉकीपटू घडू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या विजयोत्सवाला उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर, उत्तम शिंदे, स्वानंद गोडबोले, रमाकांत कारेकर, विकास कलघटगी, प्रकाश बिळगोजी, माजी महापौर संजय शिंदे, निखिल शिंदे, संतोष दरेकर, कुदळे, चेतन दोडमणी, सविता हेब्बार, सविता वेसणे, सुप्रिया कारेकर, तनुश्री कोलार, दयानंद कारेकर आदी उपस्थित होते.

भारतीय हॉकीच्या या ऐतिहासिक दुहेरी सुवर्णयशाचा आनंद बेळगावच्या क्रीडाप्रेमींनी जल्लोषात साजरा केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three + 18 =

error: Content is protected !!