बेळगाव : प्रतिनिधी
विसर्जन मिरवणुकीदरम्यान फटाका अंगावर पडल्याने गंभीररीत्या भाजलेल्या उप्पार गल्ली येथील सात वर्षीय कुशल रोहित सपारे या बालकाच्या उपचारासाठी जायंट्स ग्रुप मेनतर्फे तातडीने २० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
गुरुवारच्या ‘तरुण भारत’मध्ये ‘जखमी बालकाच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन’ या मथळ्याखाली कुशलच्या अपघाताची बातमी प्रसिद्ध झाली होती. विसर्जन मिरवणुकीतील फटाका अंगावर पडल्याने कुशल गंभीररीत्या भाजला असून त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते.
या आवाहनाची दखल घेत जायंट्स ग्रुप मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी ग्रुपच्या सभासदांना मदतीचे आवाहन केले. त्याला सभासदांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारीच सभासदांनी २० हजार रुपये जमा करून ही रक्कम कुशलचे वडील रोहित सपारे यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी जायंट्स ग्रुप मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, उपाध्यक्ष अरुण काळे, को-ऑर्डिनेटर अशोक हलगेकर, आनंद कुलकर्णी, राहुल बेलवलकर, आकाश लाटूकर, पुंडलीक पावशे आणि सचिव विश्वास पवार आदी उपस्थित होते.
सपारे कुटुंबीयांनी या कठीण प्रसंगी मदतीचा हात दिल्याबद्दल जायंट्स ग्रुपच्या सर्व सभासदांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.
