दोन दिवसांत शेड हटवण्याची मागणी; महानगरपालिकेच्या दुजाभावाच्या कारभारावर नागरिकांचा आक्षेप
बेळगाव : प्रतिनिधी
भाग्यनगर येथील वृंदावन कॉलनी (५ वा क्रॉस) परिसरातील लहान मुलांसाठी राखीव असलेल्या खेळाच्या मैदानावर उभारण्यात येणाऱ्या शेडला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून नागरिकांनी महानगरपालिकेकडे यासंदर्भात तक्रारी करून मैदानावर कोणतेही शेड अथवा धार्मिक स्वरूपाचे बांधकाम करू नये, अशी मागणी केली होती. मात्र, त्यांच्या मागणीची दखल घेतली जात नसल्याने अखेर संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांतदादा कोंडुस्कर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
वृंदावन कॉलनीतील सदर लेआउट रहिवाशांनी रीतसर सरकारी शुल्क भरून विकसित केलेला खासगी लेआउट असून, लहान मुलांसाठी राखीव असलेल्या मैदानावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये, अशी नागरिकांची भूमिका आहे. मात्र, स्थानिक भाजप नगरसेवकांच्या दबावामुळे आणि महानगरपालिकेच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, मैदानावर सुरू असलेल्या बांधकामाबाबत स्थानिक नागरिकांनी कंत्राटदाराकडे चौकशी केली असता, नवरात्रोत्सवात देवीच्या स्थापनेसाठी महानगरपालिकेकडून अधिकृत मंजुरी घेऊन हे शेड उभारण्यात येत असल्याचे त्याने सांगितले. यामुळे नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदविला.
केवळ एका गल्लीतील विशिष्ट मंडळासाठी महानगरपालिकेने अशा प्रकारे शेड उभारणे योग्य आहे का? जर पालिकेकडे यासाठी निधी उपलब्ध असेल, तर शहरातील ज्या ज्या ठिकाणी सरकारी जागा उपलब्ध आहेत, त्या सर्व ठिकाणी अशा शेडची उभारणी करावी, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. या प्रश्नावर कंत्राटदाराकडे समाधानकारक उत्तर नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत रमाकांतदादा कोंडुस्कर यांनी तत्काळ बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त जी. कार्तिक यांच्याशी संपर्क साधला. संबंधित मैदानावरील शेड दोन दिवसांत हटविण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी बोलताना, बेळगाव शहरात १०० हून अधिक नवरात्रोत्सव मंडळे आहेत. महानगरपालिका जर एका मंडळासाठी अशा प्रकारे शेड बांधून देणार असेल, तर हाच न्याय शहरातील सर्व मंडळांना लागू करावा. एका मंडळाला एक न्याय आणि दुसऱ्या मंडळाला वेगळा न्याय, असा दुजाभाव करून नागरिकांना वेठीस धरू नये, असा स्पष्ट इशाराही त्यांनी पालिका प्रशासनाला दिला.
खेळाच्या मैदानाचे संरक्षण आणि नागरिकांच्या हक्कांसाठी स्थानिक रहिवाशांनी घेतलेल्या भूमिकेला रमाकांतदादा कोंडुस्कर यांनी पाठिंबा दिल्याने आता महानगरपालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे वृंदावन कॉलनीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
