बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती २२ सप्टेंबर रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील शिक्षिका स्नेहल बेळगावकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. सामूहिक शिक्षणाचे पुरस्कर्ते असलेल्या भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाचा प्रसार केला. तसेच ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागास घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या कार्याशीही भाऊराव पाटील यांचे योगदान जोडलेले होते. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला.
यावेळी इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी साची श्रीधर सांबरेकर हिने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांवर प्रकाश टाकला. तसेच तिसरी ‘ब’ वर्गाच्या वर्गशिक्षिका माधुरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्यावर आधारित भित्तिपत्रके तयार केली.
कार्यक्रमाला शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शिक्षक समन्वयक सविता पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
