युवा समिती सीमाभाग व पुणे विभाग समितीची बेळगावात संयुक्त बैठक
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभाग यांची संयुक्त बैठक गुरुवारी (१७ सप्टेंबर) बेळगाव येथील मराठा मंदिर येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके होते.
सीमाप्रश्नाच्या लढ्याला महाराष्ट्रातून अधिक व्यापक पाठबळ मिळावे तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांच्या विविध प्रश्नांबाबत महाराष्ट्रात सातत्याने जनजागृती व्हावी, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी शुभम शेळके म्हणाले की, सीमालढा केवळ सीमाभागापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रातूनही लढला गेला पाहिजे. महाराष्ट्रात सीमाप्रश्नाबाबत सातत्याने जनजागृती होणे आवश्यक आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पुणे विभाग समितीच्या कार्यकर्त्यांनी सीमालढ्यात सक्रिय सहभाग घेत सीमावासीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे दाखवून दिले आहे. भविष्यातही महाराष्ट्र सरकारला सीमाप्रश्नाबाबत जागृत ठेवण्यासोबत व्यापक जनजागृतीचे कार्य पुणे विभागाने सुरू ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
युवा समितीचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी पुणे विभाग समितीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. अल्पावधीत पुणे विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत कार्यकर्त्यांच्या योगदानाचा यथोचित सन्मान झाला पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
पुणे विभाग समितीचे विश्वनाथ पाखरे यांनी महाराष्ट्रातील विविध लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊन सीमाप्रश्न तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांबाबत निवेदने देऊन करण्यात आलेल्या जनजागृतीची माहिती दिली.
गणपती पाटील यांनी पुणे येथे सीमाप्रश्नाच्या संदर्भात आंदोलन हाती घेतल्यास पुणे विभाग समिती त्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करेल, असे सांगितले.
दरम्यान, पुण्यातून सीमालढ्याबाबत जनजागृतीच्या कार्याला सुरुवात करणाऱ्या पुणे विभाग समितीच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. ‘लढा नाहीतर गुलामीची सवय होईल’ या ब्रीदवाक्याचे मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
बैठकीच्या शेवटी सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी युवा समितीचे नगरसेवक व खजिनदार शिवाजी मंडोळकर, अशोक घगवे, इंद्रजित धामणेकर, सागर कणबरकर, रणजित हावळानाचे, निलेश काकतकर, सूरज जाधव, सुनील पाटील, मनोज बेळगुंदकर, वैभव कुट्रे, विनायक पवार, अभिजित मजुकर, राजू पाटील, अभिषेक कारेकर, विशाल कुंडेकर तसेच पुणे विभागाचे सातेरी पाटील, वैराळ सुळकर, विठ्ठल पाखरे, भुजंग पाखरे, बाळकृष्ण पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
