बेळगाव, दि. ११ सप्टेंबर : कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी आणि त्यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित २१ ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापेमारी व झडतीची कारवाई केली. बंगळुरू झोनल कार्यालयाच्या पथकाने ९ आणि १० सप्टेंबर रोजी बंगळुरू, बेळगाव, गोकाक आणि कोलकाता येथील चार ठिकाणी ही कारवाई केली.
ईडीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, Foreign Exchange Management Act (FEMA) अंतर्गत जारकीहोळी कुटुंबीयांच्या कथित परदेशी गुंतवणुका, सीमापार व्यावसायिक संबंध आणि संशयित आर्थिक अनियमिततांची चौकशी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
या झडतीमध्ये चिक्कोडीच्या खासदार तथा सतीश जारकीहोळी यांच्या कन्या प्रियांका जारकीहोळी, राहुल जारकीहोळी, त्यांचे मेहुणे वाय. डी. मंजुनाथ तसेच सतीश जारकीहोळी यांचे OSD व वैयक्तिक सहाय्यक मलागौडा पाटील, राजू दरगशेट्टी, विठ्ठल परसन्नावर आणि डॉ. गिरीश सोरमळकर यांच्याशी संबंधित मालमत्तांचाही समावेश होता.
ईडीने भारत वनिज्य ईस्टर्न प्रायव्हेट लिमिटेड (BVEPL) या खासगी कंपनीच्या कार्यालयांवर व मालकांच्या निवासस्थानांवरही झडती घेतली. कंपनीने PWD विभागातील कंत्राट मिळवण्यासाठी कथितरित्या मोठी लाच दिल्याचा आणि त्यातून परदेशी मालमत्ता मिळवल्याचा आरोप असल्याचे ईडीने म्हटले आहे.
झडतीदरम्यान जारकीहोळी कुटुंबीयांचा काँगोतील Eldorado Mining Resources आणि झांबियातील Nova Aurum Mining Ltd यांसह विविध परदेशी संस्थांमध्ये भागभांडवली सहभाग असल्याचे कागदपत्रांतून समोर आल्याचा दावा ईडीने केला आहे. तसेच सतीश जारकीहोळी यांचा काँगोमधील Magnitude Star SARL या सोन्याच्या खाण व्यवसायाशी संबंधित कंपनीत जवळपास ४० टक्के हिस्सा असल्याचेही ईडीने म्हटले आहे.
या कारवाईत भारतीय चलनातील सुमारे ३.३ कोटी रुपये आणि अमेरिकन डॉलर, युरो आदी परकीय चलन मिळून सुमारे १५ लाख रुपये इतकी बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.
याशिवाय काँगोमध्ये अनधिकृत माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोख गुंतवणूक केल्याचे पुरावे, PWD विभागातील कथित अनियमिततेशी संबंधित कागदपत्रे तसेच कंत्राटदारांकडून कथित लाच वसुलीशी संबंधित डिजिटल उपकरणे आणि इतर साहित्य मिळाल्याचे ईडीने सांगितले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.
