बेळगाव : मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच मराठी शाळांची पटसंख्या वाढवून या शाळा टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव तालुक्यातील विविध मराठी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत तुरमुरी, बाची, कोनेवाडी, बसुर्ते, बेक्किनकेरे, उचगाव, कल्लेहोळ, आतवाड, मन्नूर, गोजगा, हिंडलगा, सुळगा, गणेशपूर, विजयनगर तसेच बेनकनहळ्ळी आदी गावांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
तुरमुरी प्राथमिक शाळेत साहित्य वितरणावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पदाधिकारी आशिष कोचेरी यांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने गेल्या नऊ वर्षांपासून मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या पालकांचे कौतुक करण्यासाठी शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
बाची येथील शाळेत युवा समितीचे पदाधिकारी निखिल देसाई यांनी समितीच्या या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना अंकलिपी पुस्तिका, वह्या, पेन्सिल किट आदी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमाला समितीचे कार्यकर्ते महेंद्र जाधव, प्रताप राजुकर, निरंजन अष्टेकर, श्रीशैल मासेकर, नागेंद्र तंगणकर, महेश चौगुले, नागेश बेळगावकर, हेमंत कंग्राळकर यांच्यासह मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, शिक्षकवर्ग, शाळा सुधारणा समितीचे सदस्य आणि गावकरी उपस्थित होते.
