बेळगाव, दि. १० ऑगस्ट २०२६ : किर्लोस्कर रोड येथील ‘फ्लाय विमान एव्हिएशन अकॅडमी’च्या चेअरमन, एमडी व मॅनेजर यांना खादेबाजार पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ७३/२०२६ प्रकरणात बेळगाव येथील प्रथम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
तक्रारीनुसार, एव्हिएशन अकॅडमीमार्फत प्रशिक्षण व नोकरीचे आश्वासन देऊन तक्रारदाराकडून १ लाख ५१ हजार २४० रुपये फी घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८(४) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान अर्जदारांच्या वतीने अॅड. सिद्धार्थराजे सावंत यांनी प्रभावी युक्तिवाद केला. अकॅडमीने भविष्यातील नोकरीची कोणतीही हमी दिलेली नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच संबंधित अकॅडमी अधिकृत व नोंदणीकृत असून, संबंधित विभागाचा परवाना असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
तक्रारदाराला अकॅडमीकडून काही महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आल्याची बाबही न्यायालयासमोर मांडण्यात आली. या सर्व बाबींचा विचार करून प्रथम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने अकॅडमीच्या चेअरमन, एमडी व मॅनेजर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या प्रकरणात तिन्ही आरोपींच्या वतीने अॅड. सिद्धार्थराजे सावंत यांनी बाजू मांडली असून, पुढील कायदेशीर कार्यवाहीचे कामकाजही ते पाहणार आहेत.
