बेळगावात ६ ते ९ सप्टेंबरदरम्यान श्री गणेश फेस्टिवलचे आयोजन

बेळगावात ६ ते ९ सप्टेंबरदरम्यान श्री गणेश फेस्टिवलचे आयोजन

बेळगाव : श्री माता सोसायटीचे चेअरमन श्री. मनोहर देसाई यांच्या संकल्पनेतून बेळगावात गेल्या २८ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या श्री गणेश फेस्टिवलचे यंदाही आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ६ सप्टेंबर ते बुधवार, ९ सप्टेंबरदरम्यान विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला विधायक दिशा देणाऱ्या या फेस्टिवलमध्ये सलग चार दिवस विविध उपक्रम होणार असून, अंतिम दिवशी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा ‘नवरत्न सन्मान’ देऊन गौरव करण्यात येणार आहे.

फेस्टिवलची सुरुवात ६ सप्टेंबर रोजी महिलांच्या पाककला स्पर्धेने होणार आहे. यावेळी मिलेट्स अर्थात तृणधान्यांपासून गोड व तिखट पदार्थ बनविण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धकांनी पदार्थ घरी तयार करून त्याची कृती व साहित्य सोबत आणायचे आहे. राळा, भगर (वरी), बाजरी, राजगिरा, नाचणी, चेना, कुठळी, कोदरा, कोराळे व ज्वारी यापैकी कोणतेही एक किंवा दोन तृणधान्य वापरता येणार आहेत.

७ सप्टेंबर रोजी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार असून, १८ वर्षांवरील आणि १८ वर्षांखालील असे दोन गट करण्यात आले आहेत. स्पर्धकांनी रांगोळी घरून आणणे आवश्यक असून, स्पर्धेच्या ठिकाणी केवळ रांगोळीचा वापर करता येणार आहे. पाककला व रांगोळी या दोन्ही स्पर्धा शास्त्रीनगर येथील ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम शाळेत दुपारी २.३० वाजता सुरू होतील. विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.

८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता न्यू गुड शेड रोड येथील श्री माता सोसायटी सभागृहात नक्षत्र ग्रुप, बेळगाव प्रस्तुत मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तर ९ सप्टेंबर रोजी ‘नवरत्न सन्मान’ सोहळ्याने यंदाच्या श्री गणेश फेस्टिवलची सांगता होणार आहे. सामाजिक, साहित्य, संगीत, उद्योग, क्रीडा, श्रम, कृषी, कला तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.

चार दिवस चालणाऱ्या या श्री गणेश फेस्टिवलमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 − three =

error: Content is protected !!