बेळगाव, दि. २७ : बेळगाव येथील यश ऑटोचे संचालक शिवसंत संजय मोरे यांचे चिरंजीव यश संजय मोरे यांनी पीईएस युनिव्हर्सिटी, बेंगळुरू येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेची बी.टेक. पदवी यशस्वीरित्या संपादन करत सेमीकंडक्टर (Semiconductor) या अत्याधुनिक क्षेत्रातील स्पेशलायझेशन पूर्ण केले आहे. त्यांचा पदवीदान (दीक्षांत) समारंभ २६ जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
मूळचे राकसकोप गावचे आणि सध्या लक्ष्मीनगर, बेळगाव येथे वास्तव्यास असलेले यश मोरे यांनी आपले शालेय शिक्षण सेंट पॉल हायस्कूल, बेळगाव येथे पूर्ण केले. त्यानंतर अल्वास पीयू कॉलेज, मुडबिद्री येथे बारावीचे शिक्षण घेतले. उच्च शिक्षणाच्या तयारीसाठी त्यांनी राजस्थानातील कोटा येथे विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर पीईएस युनिव्हर्सिटीमध्ये अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश मिळविला.
कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमधील बी.टेक. पदवीसह सेमीकंडक्टर क्षेत्रातील विशेष प्राविण्य मिळविले. कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रॉनिक्स आणि आधुनिक संगणकीय तंत्रज्ञानाच्या युगात सेमीकंडक्टर क्षेत्राचे वाढते महत्त्व लक्षात घेता त्यांचे हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात आहे.
यश मोरे यांच्या गुणवत्तेची दखल घेत इनमोबी (InMobi) या आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीने त्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड केली आहे. सध्या ते कंपनीमध्ये इंटर्नशिप करत असून, त्यांच्या या यशामुळे मोरे कुटुंबीयांसह राकसकोप आणि बेळगाव परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
यश मोरे यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक व व्यावसायिक यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षक, उद्योग क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध स्तरांतील शुभेच्छुकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक, संशोधन आणि व्यावसायिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
