गुणवंत विद्यार्थिनी अश्विनी पुजारीच्या आयआयटीच्या स्वप्नाला संजीवीनी फौंडेशनचा आधार

गुणवंत विद्यार्थिनी अश्विनी पुजारीच्या आयआयटीच्या स्वप्नाला संजीवीनी फौंडेशनचा आधार

बेळगाव : ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवंत विद्यार्थिनी कु. अश्विनी पुजारी हिच्या उच्च शिक्षणासाठी संजीवीनी फौंडेशनने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. यंदाही फौंडेशनतर्फे तिच्या पीयूसी द्वितीय वर्षाचे शैक्षणिक शुल्क भरून तिच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्यात आले आहे.

निपाणी तालुक्यातील ढोणेवाडी येथील अश्विनी हिची शैक्षणिक जबाबदारी संजीवीनी फौंडेशनने गतवर्षी स्वीकारली होती. फौंडेशनच्या माध्यमातून तिला अल्वास महाविद्यालय, मूडबिद्री येथे पीयूसी प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळवून देण्यात आला होता. तसेच संपूर्ण वर्षभराचा वसतिगृह खर्चही फौंडेशनने उचलला होता.

अश्विनीने प्रथम वर्षात उत्कृष्ट गुण मिळवत यश संपादन केले असून, तिचे आयआयटीमधून अभियांत्रिकी शिक्षण घेण्याचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती सध्या जेईई प्रवेश परीक्षेची तयारी करत आहे. तिच्या शैक्षणिक प्रगतीसाठी फौंडेशनच्या संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ आणि शिक्षिका मुक्ता मोटराचे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभत आहे.

संजीवीनी फौंडेशनचे चेअरमन मदन बामणे यांनी सांगितले की, फौंडेशनतर्फे “वृद्धांना आधार”, “रुग्णांना आधार” आणि “विद्या आधार” या महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. अश्विनीला “विद्या आधार” योजनेअंतर्गत मदत करण्यात येत असून, याच योजनेतून आणखी एका होतकरू विद्यार्थिनीच्या एमबीए शिक्षणाचा संपूर्ण खर्चही फौंडेशन उचलत आहे.

ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी आणि त्यांची स्वप्ने साकार व्हावीत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे मदन बामणे यांनी सांगितले.

या मदतीबद्दल अश्विनी पुजारीच्या पालकांनी तसेच शिक्षकांनी संजीवीनी फौंडेशनचे आभार व्यक्त केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 4 =

error: Content is protected !!