खानापूर तालुक्याचे पाणी बाहेर वळविण्याचा आरोप; ब्लॉक काँग्रेसने उपस्थित केले प्रश्न

खानापूर तालुक्याचे पाणी बाहेर वळविण्याचा आरोप; ब्लॉक काँग्रेसने उपस्थित केले प्रश्न

खानापूर : खानापूर तालुक्याचे हक्काचे पाणी इतर तालुक्यांकडे वळविले जात असल्याचा आरोप करत खानापूर ब्लॉक काँग्रेसने स्थानिक आमदार, खासदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे. भविष्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यास तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट ओढवू शकते, अशा पार्श्वभूमीवर पाण्याच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी मौन का बाळगत आहेत, असा सवाल काँग्रेसने केला आहे.

खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पारिश्वाड आणि कुसमळी भागानंतर आता नेरसा परिसरातून मलप्रभा नदीचे पाणी बंद पाईपलाईनद्वारे उचलण्याचे नियोजन सुरू असून त्यासंदर्भातील कामेही सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत तालुक्याचे हक्काचे पाणी बाहेर कसे जाऊ दिले जात आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

उन्हाळ्यात बैलूरसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असल्याचे सांगत, स्थानिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेलवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे तालुक्याच्या पाण्याच्या हक्काबाबत आमदार, खासदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ब्लॉक काँग्रेसने केली आहे.

तसेच, खानापूर तालुक्याचे पाणी बाहेर वळविण्याच्या निर्णयामागे नेमके काय कारण आहे आणि याबाबत भाजप पदाधिकारी मौन का बाळगत आहेत, याचे उत्तर जनतेला द्यावे, अशी मागणीही ब्लॉक काँग्रेसने केली आहे.

(टीप : ही भूमिका आणि आरोप खानापूर ब्लॉक काँग्रेसने प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडले आहेत. संबंधित लोकप्रतिनिधी किंवा भाजपकडून यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही.)

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twelve + seven =

error: Content is protected !!