बेळगाव : भारत विकास परिषद, बेळगाव शाखेतर्फे परिषदेचा ६४ वा स्थापना दिवस शुक्रवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय संगठन मंत्री सुरेश जैन (दिल्ली) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट आर. एन. हरगुडे आणि ख्यातनाम डॉ. रमाकांत नायक हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर भारतमाता, स्वामी विवेकानंद आणि परिषदेचे संस्थापक डॉ. सुरज प्रकाश यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. अक्षता मोरे यांनी ‘वंदे मातरम’चे सुमधुर गायन करून कार्यक्रमाला देशभक्तीपूर्ण वातावरण दिले.
भारत विकास परिषद, बेळगाव शाखेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्या स्वाती घोडेकर यांनी परिषदेच्या विविध सेवाकार्यांचा आढावा घेतला. दक्षिण भारत विभागीय सेवा सचिव पांडुरंग नायक यांनी नव्या सदस्यांना पदग्रहणाची शपथ देत समाजसेवा आणि राष्ट्रसेवेचा संकल्प करून घेतला.
मुख्य अतिथी सुरेश जैन यांनी आपल्या मार्गदर्शनात भारत विकास परिषदेची उद्दिष्टे, निस्वार्थ सेवा, राष्ट्रीय एकात्मता, भारतीय संस्कृतीचे संवर्धन आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान यावर सविस्तर विचार मांडले. महिलांनी आत्मनिर्भर बनून समाजपरिवर्तनात सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
स्थापना दिनानिमित्त समाजातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सीए आर. एन. हरगुडे आणि डॉ. रमाकांत नायक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. दोन्ही मान्यवरांनी भारत विकास परिषदेच्या राष्ट्रहित आणि समाजसेवेच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी परिषदेच्या महिला सदस्या सुखदा देशपांडे, प्रा. अरुणा नाईक, रजनी गुर्जर, जया नायक आणि स्वाती घोडेकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. तसेच, आत्मनिर्भरतेसाठी एका गरजू महिलेला शिलाई मशीन देण्यात आले, तर गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शुल्कासाठी आर्थिक मदतही प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुणा नाईक यांनी केले, तर प्रा. प्रतिभा हल्लेप्पनवर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास भारत विकास परिषदेचे पदाधिकारी, सदस्य आणि निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
