बेळगाव : प्रतिनिधी
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे चलवेनहट्टी–अगसगे मुख्य रस्त्यावर मध्यरात्री बाभळीचा मोठा वृक्ष कोसळला. त्यामुळे बेळगाव शहर परिसराकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मात्र, घटनेची माहिती मिळताच अगसगे ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष व कार्यशील सदस्य गुंडू कुरेण्णवर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
त्यांच्यासमवेत ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी उमेश कांबळे व लक्ष्मण कंग्राळकर यांनी झाड हटविण्याचे काम हाती घेतले. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे काही वेळातच रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करण्यात आले आणि वाहतुकीसाठी रस्ता पुन्हा खुला करण्यात आला. त्यामुळे अडकून पडलेली वाहतूक सुरळीत झाली.
मध्यरात्रीच्या वादळी वाऱ्यामुळे अचानक झाड कोसळल्याने पहाटे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यावर झाड आडवे पडल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. सुदैवाने अतिवृष्टीमुळे शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याने वर्दळ कमी होती आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पहाटेची वेळ असल्याने वन विभाग किंवा संबंधित प्रशासनाशी तातडीने संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे बस, चारचाकी व दुचाकी वाहनधारकांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागला. अनेक प्रवाशांना हंदिगनूर–मण्णीकेरे मार्गे वळसा घालून प्रवास करावा लागला.
दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गुंडू कुरेण्णवर यांनी तातडीने पुढाकार घेत रस्ता मोकळा करून दिल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. तसेच त्यांच्या व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या तत्पर कार्याचे कौतुक करत आभारही मानले.
