कोल्हापूर, ५ जुलै : कर्नाटकातील दावणगेरे (होदगीरे/औदीगिरी) येथे असलेल्या राजे शहाजी महाराजांच्या ऐतिहासिक समाधीस्थळाच्या संवर्धन, पुनर्विकास आणि देखभालीसाठी केंद्रीय समिती स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण मागणी आज खासदार धैर्यशील माने यांच्याकडे करण्यात आली. कोल्हापूर येथील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भातील सविस्तर लेखी निवेदन त्यांना सुपूर्द केले.
या बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्यासह सागर पाटील, आनंद आपटेकर आणि राजेंद्र बैलूर हे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या विविध प्रश्नांबरोबरच शिवछत्रपतींच्या इतिहासाशी निगडित या महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात कर्नाटक राज्यातील दावणगेरे (होदगीरे) येथे असलेल्या राजे शहाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी त्याचा सर्वंकष पुनर्विकास करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. हे काम महाराष्ट्र शासन आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (ASI) यांच्या संयुक्त विद्यमाने तातडीने हाती घेण्यात यावे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याशिवाय, समाधीस्थळाच्या दीर्घकालीन देखभाल, संवर्धन आणि विकासासाठी ‘केंद्रीय समिती’ स्थापन करण्यात यावी. या समितीत महाराष्ट्र, कर्नाटक तसेच देशातील विविध राज्यांतील शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक आणि संबंधित प्रतिनिधींचा समावेश करून या ऐतिहासिक वारशाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जतन करण्याची व्यवस्था उभी करावी, अशी सूचनाही शिष्टमंडळाने केली.
या विषयाचे ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व लक्षात घेऊन खासदार धैर्यशील माने यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेतली. हा विषय महाराष्ट्र शासन तसेच केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालय आणि पुरातत्व विभागाकडे प्रभावीपणे मांडून आवश्यक त्या सर्व पातळ्यांवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
या बैठकीमुळे राजे शहाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या संवर्धनासाठी नव्याने प्रयत्नांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, सीमाभागातील मराठी बांधवांच्या अस्मितेशी संबंधित प्रश्नांनाही अधिक प्रभावीपणे वाचा फुटेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
