बेळगाव : श्रीराम सेनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी सकल मराठा समाज व भाजप नेते किरण जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट देत होदगीरे (औदगीरी) येथील स्वराज्याचे मूळ पुरुष छत्रपती शहाजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या रखडलेल्या विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी बेळगावातील सकल मराठा समाजाच्या सामाजिक उपक्रमांचे तसेच किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विविध लोकहिताच्या कामांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
बैठकीत छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या विकासासाठी शासन स्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. काही दिवसांपूर्वी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने होदगीरे येथील समाधीस्थळाला भेट देऊन विकासकामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता श्रीराम सेना आणि सकल मराठा समाज संयुक्तपणे या प्रश्नाचा पाठपुरावा करणार असल्याचे बैठकीत ठरले.
यावेळी बोलताना प्रमोद मुतालिक म्हणाले, “बेळगावमध्ये किरण जाधव आणि सकल मराठा समाज अत्यंत कौतुकास्पद कार्य करत आहेत. छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा विकास हा आपल्या इतिहास आणि अस्मितेशी निगडित विषय आहे. या ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी आम्ही एकत्र येऊन सरकारकडे ठामपणे मागणी करणार आहोत.”
बैठकीत आगामी काळात समाधीस्थळाच्या विकासासाठी व्यापक जनआंदोलन उभारणे, शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणे तसेच संबंधित विभागांशी समन्वय साधून रखडलेल्या कामांना गती देण्याबाबत चर्चा झाली.
या प्रसंगी श्रीराम सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भाजप नेते किरण जाधव आणि सकल मराठा समाजाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
