शांताई वृद्धाश्रमातील वृद्धाचा पाय केएलई रुग्णालयाने वाचवला; महिनाभराच्या उपचारानंतर घरी परत

शांताई वृद्धाश्रमातील वृद्धाचा पाय केएलई रुग्णालयाने वाचवला; महिनाभराच्या उपचारानंतर घरी परत

बेळगाव, २ जुलै : शांताई वृद्धाश्रमातील ७८ वर्षीय रहिवासी दीपक यांचा गंभीर जखमी झालेला पाय वेळेवर उपचार मिळाल्यामुळे वाचला असून संभाव्य पाय कापण्याची वेळ टळली आहे. केएलई डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयातील डॉक्टरांनी जवळपास महिनाभर उपचार करून त्यांना पूर्णपणे बरे केले.

दीपक यांच्या पायावरील जखम गँगरीनमध्ये रूपांतरित होण्याचा धोका निर्माण झाला होता. ही गंभीर बाब माजी महापौर विजय मोरे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ. अभिजित गोगटे यांच्याशी संपर्क साधला. डॉ. गोगटे यांनी त्वरित केएलई डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयाच्या मोफत वॉर्डमध्ये त्यांना दाखल करण्याची व्यवस्था केली.

रुग्णालयातील डॉक्टरांनी सुमारे महिनाभर शस्त्रक्रिया व आवश्यक उपचार करून दीपक यांचा पाय कापण्याची वेळ येऊ दिली नाही. प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

या निस्वार्थ सेवेसाठी माजी महापौर विजय मोरे, त्यांचे पुत्र अॅलन मोरे, संतोष मामदापूर, गंगाधर पाटील तसेच अन्य सहकाऱ्यांनी केएलई रुग्णालयातील डॉक्टर व प्रशासनाचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी प्राचार्य डॉ. राजेश पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आरिफ मालदार, डॉ. आर. एस. मुधोळ, डॉ. विनसूरकर, डॉ. मनोज टोगले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जनसंपर्क अधिकारी राजू हडिमणी आणि गंगनगौडा पाटील यांनी रुग्णाची वैयक्तिक काळजी घेतल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

डॉ. अभिजित गोगटे, डॉ. विनोद करगी, डॉ. प्रशांत होम्बळ तसेच पदव्युत्तर डॉक्टर डॉ. सागरिका, डॉ. जयपवन आणि डॉ. शांतनू यांनी दिलेल्या सातत्यपूर्ण उपचार व सेवेसाठीही त्यांचे कौतुक करण्यात आले.

यावेळी विजय मोरे यांनी केएलई रुग्णालयातील संपूर्ण वैद्यकीय पथकाचे कौतुक करत, वृद्ध रुग्णांना मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा देण्याची परंपरा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. उपचारानंतर आनंद व्यक्त करत दीपक आजोबांनी त्यांची सेवा करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांना चॉकलेट वाटून आभार मानले.

शांताई वृद्धाश्रमाच्या वतीनेही केएलई रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे दीपक यांना नवजीवन मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen − 9 =

error: Content is protected !!