येळळूरमध्ये अवजड वाहतुकीविरोधात रास्ता रोको; प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

येळळूरमध्ये अवजड वाहतुकीविरोधात रास्ता रोको; प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

बेळगाव, दि. 28 : हालगा–मच्छे बायपास रस्त्याच्या कामामुळे येळळूर गावातून सुरू असलेल्या अवजड डंपर वाहतुकीविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि ग्रामस्थांनी रविवारी सकाळी येळळूर वेशीवर रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

घटनेची माहिती मिळताच वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्काप्पा जोडट्टी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत संबंधित रस्ते कंत्राटदाराला घटनास्थळी बोलावले. चर्चेनंतर सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत अवजड वाहतूक बंद ठेवणे, पर्यायी मार्गाचा वापर करणे, रस्त्यावर चिखल होणार नाही याची काळजी घेणे तसेच आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर उभारण्याचे आश्वासन देण्यात आले.

यावेळी अशोका बिल्डकॉनचे सुपरवायझर पंकज माळी यांनाही निवेदन देण्यात आले. तसेच यरमाळ–येळळूर मार्गावर एकेरी वाहतुकीचा विचार करावा आणि डंपर चालकांना सावकाश वाहन चालविण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष दुधाप्पा बागेवाडी, सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर, उपाध्यक्ष राजू पावले, दत्ता उघाडे, डॉ. विवेक मेणसे, सतीश कुगजी, सुरज गोरल, दयानंद उघाडे, राकेश परीट यांच्यासह शेकडो ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले.

प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको मागे घेतला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 − 8 =

error: Content is protected !!