बेळगाव : जागतिक अंमली पदार्थ सेवनविरोधी दिनानिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन आणि आदर्श विद्यामंदिर, अळवण गल्ली, शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यात अडकणाऱ्या युवा पिढीला त्यापासून दूर ठेवण्यासाठी आणि समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली.
रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी आणि उपस्थितांनी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणारे संदेश दिले. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे युवकांची मानसिकता बदलत असून, बौद्धिक विकासाऐवजी त्यांची वाटचाल विनाशाकडे होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. विचारशक्तीचा ऱ्हास होऊन अविचारी वर्तन वाढत असल्याने समाजाच्या प्रत्येक स्तरावर अंमली पदार्थांचे उच्चाटन होणे आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
रॅलीला संबोधित करताना जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी सांगितले की, जायंट्स ग्रुप ही संस्था समाजपरिवर्तन आणि विविध जनजागृती अभियानांसाठी सातत्याने कार्यरत आहे. अंमली पदार्थांपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी पालकांनी कोणती काळजी घ्यावी आणि कोणती दक्षता घ्यावी, याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास आदर्श विद्यामंदिरचे मुख्याध्यापक विठ्ठल पाटील, शिक्षक जे. बी. पाटील, शिक्षिका मनीषा शिनोळकर, माधुरी कुलकर्णी, भारता बागेवाडी तसेच जायंट्स ग्रुपचे फेडरेशन ऑफिसर सुनील मुतगेकर, को-ऑर्डिनेटर अशोक हलगेकर, उपाध्यक्ष अरुण काळे, मधु बेळगांवकर, जयवंत पाटील, विनोद आंबेवाडोकर, माजी अध्यक्ष शिवराज पाटील, सचिन पवार, मोहन पत्तार, ईश्वर पाटील, दिगंबर किड्डेकर, आनंद कुलकर्णी, राहुल बेलवलकर, विजय बन्सूर आदी मान्यवर उपस्थित होते.
