कोल्हापूर, दि. २६ जून : १५२ व्या राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सवानिमित्त गंगाधर वृत्तपत्राच्या वतीने आयोजित पहिल्या अखिल भारतीय ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज संवाद परिषदे’ मध्ये बेळगाव सीमाभागातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि मराठी भाषा-संस्कृतीच्या जतनासाठी कार्यरत असलेले प्राचार्य आनंद आपटेकर यांना प्रतिष्ठेच्या ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.
कोल्हापूर येथील मोहमेडन एज्युकेशन सोसायटी हॉल, दसरा चौक येथे झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. शंकर अंदानी (अहिल्यानगर) होते. कार्यक्रमाला पद्मश्री उदय देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या हस्ते प्राचार्य आनंद आपटेकर यांना पुरस्कार, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. उद्घाटन संपादक श्रीराम पच्छिंद्रे, सीमाकवी रवींद्र पाटील, शिक्षक नेते दादासाहेब लाड तसेच भूदरगडच्या माजी सभापती अक्काताई नलवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्राचार्य आनंद आपटेकर हे बेळगाव सीमाभागातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच मराठी भाषा व संस्कृतीच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्राबरोबरच वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
सध्या ते बेळगाव मध्यवर्ती दसरा कमिटीचे अध्यक्ष, बेळगावचा राजा गणेश मंडळ (चवाट गल्ली)चे सचिव, श्री ज्योतिर्लिंग भक्त मंडळाचे खजिनदार, मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाचे सरचिटणीस, भारतीय गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक-सचिव तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमाभाग वैद्यकीय समन्वयक या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत आहेत.
त्यांच्या बहुआयामी सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी साहित्यिक किसनराव कुऱ्हाडे, लक्ष्मण किल्लेकर, संदीप कदम, परशराम गाडेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य आनंद आपटेकर यांच्या कार्याचा झालेला हा गौरव बेळगाव सीमाभागासाठी अभिमानाची बाब मानली जात असून, उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
