बेळगाव : योगामुळे मनुष्य शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, निरोगी आणि मानसिकदृष्ट्या सक्षम राहतो. योगाचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा यासाठी भारताने घेतलेल्या पुढाकारामुळे आज संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोतर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
गोवावेस येथील स्केटिंग रिंकवर आयोजित कार्यक्रमात स्केटर्सनी तब्बल ४ किलोमीटर स्केटिंग करत योगाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा संदेश दिला. “योग करो, निरोग रहो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी बेळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक नितीन जाधव यांनी उपस्थित स्केटर्स व पालकांना मार्गदर्शन केले. आपल्या शरीराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी योग हा जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करून निरोगी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोचे पदाधिकारी, स्केटर्स आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योग रॅलीत सहभागी झालेल्या स्केटर्समध्ये प्रणव गिध्देमली, समृद्ध बानी, आरवनंद रोनद, राजवीर पाटील, प्राणिका मोटेकर, रीवा नाईक, निस्मिता होरकरी, हवीश नायडू, प्रीतम बागेवाडी, सिद्धार्थ पाटील, ऋत्विक दुबाशी, अमिषा वर्णेकर, दुर्वा पाटील, आस्त्रा सूर्यवंशी, अंजली ढवळे, आरशान माडीवाले आणि रोहिणी पाटील यांचा सहभाग होता.
योग आणि क्रीडा यांचा संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
