बेळगाव : नवोदित कवी, विद्यार्थी, कवितेचे अभ्यासक तसेच कविता लेखनाची आवड असणाऱ्या सर्वांसाठी शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मराठी विद्यानिकेतन, ज्योती कॉलेज कॅम्पस, बेळगाव येथे “काव्य लेखन कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेत ज्येष्ठ कवी व महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार (अमेरिका) प्राप्त सुप्रसिद्ध कवी अजय कांडर तसेच सुप्रसिद्ध कवी, पत्रकार आणि समीक्षक विजय चोरमारे हे सहभागीांना मार्गदर्शन करणार आहेत. मराठी विद्यानिकेतन, बेळगावचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे.
या कार्यशाळेत कविता म्हणजे काय, कवितेचे स्वरूप, कवितेचे विविध प्रकार, मराठी कवितेचा प्रवास, आधुनिक मराठी कविता, कवितेची निर्मिती प्रक्रिया, चांगल्या कवितेची वैशिष्ट्ये, प्रभावी कविता लेखन, प्रश्नोत्तरे आणि मुक्त चर्चा अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सहभागींसाठी टिपण वही, पेन तसेच सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असून कार्यशाळा पूर्णपणे मोफत आहे. मात्र, सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
साहित्यप्रेमी, नवोदित कवी, विद्यार्थी आणि कविता लेखनाची आवड असणाऱ्या सर्वांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी प्रा. अशोक आलगोंडी (९०३५३ ८५९२३), श्री. बसवंत शहापूरकर (९९००२ ९५२००) आणि श्री. सुधाकर गावडे (९०१९९ ९२९५१) यांच्याशी संपर्क साधावा.
