पोलिस आयुक्तालयाच्या परवानगीप्रमाणे थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठी माणसाचे शक्तिप्रदर्शन

पोलिस आयुक्तालयाच्या परवानगीप्रमाणे थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठी माणसाचे शक्तिप्रदर्शन

बेळगाव, प्रतिनिधी : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची तातडीची बैठक अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भाषिक अल्पसंख्याकांच्या अधिकारांसाठी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाबाबत प्रशासनाने लेखी परवानगी रद्द केल्याने पुढील भूमिका ठरविण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.

प्रशासनाच्या लेखी आदेशानुसार मोर्चास परवानगी नाकारण्यात आली असली तरी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जमून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष मनोहर किनेकर यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर जाण्याचा निर्णय झाल्यास मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भव्य शक्तिप्रदर्शन करावे, असे आवाहन केले. पियूष हावळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाचा मान राखत थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जमून निवेदन द्यावे, असे मत व्यक्त केले. त्यांच्या मताला मनोहर हुंदरे आणि अनिल पाटील यांनी दुजोरा दिला.

अॅड. अमर येळ्ळूरकर यांनी मात्र नियोजित मोर्चा काढण्याचा आग्रह धरला. यावेळी मोर्चा निघाला नाही तर भविष्यातही परवानगी मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले. एम. जी. पाटील यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जमून निवेदन देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यास डी. बी. पाटील यांनी समर्थन दिले.

आर. एम. चौगुले यांनी मोर्चा काढण्याची बाजू मांडत शहर व तालुकाभर जनजागृती झाल्याने जाहीर केल्याप्रमाणे मोर्चा व्हावा, असे मत व्यक्त केले. आबासाहेब दळवी यांनीही अटक झाली तरी बेहत्तर, परंतु मोर्चा काढावा, अशी भूमिका मांडली.

बैठकीत मुरलीधर पाटील, मोनप्पा पाटील, नारायण सांगावकर, रामचंद्र मोदगेकर, विठ्ठल पाटील, आर. के. पाटील, लक्ष्मण पाटील, लक्ष्मण होनगेकर यांच्यासह अनेक सदस्यांनी आपली मते व्यक्त केली.

दीर्घ चर्चेनंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार सर्व मराठी बांधवांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर जमून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यावे. यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त दोघेही उपस्थित असावेत, अशी मागणी करण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी कर्नाटक सरकारला पाठविणाऱ्या पत्राची प्रत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. भविष्यात कोणतीही समिती स्थापन झाल्यास त्यामध्ये मराठी प्रतिनिधींचा समावेश करावा, अशीही भूमिका बैठकीत मांडण्यात आली.

दरम्यान, सर्व मोर्चेकऱ्यांनी आपल्या वाहनांचे पार्किंग जिल्हाधिकारी कार्यालय जवळ येथे करून सकाळी अकरा वाजता थेट यावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen − thirteen =

error: Content is protected !!