बेळगाव : बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलाजवळील डेक्कन हॉस्पिटलसमोरील न्यू गुड्सशेड रस्त्याची अनेक वर्षांपासून झालेली दयनीय अवस्था लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांनी १० जून २०२६ रोजी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली.
महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार सोमवार, १५ जून रोजी विभाग अधिकारी शिल्पा जयराम यांनी न्यू गुड्सशेड रस्त्याची पाहणी केली. यावेळी रस्त्याची अत्यंत खराब अवस्था निदर्शनास आली. पाहणीनंतर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
पाहणीवेळी स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी महानगरपालिका प्रशासनाने केवळ आश्वासने न देता या प्रश्नाकडे गंभीर सार्वजनिक समस्या म्हणून पाहावे, अशी मागणी केली. तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम हाती घेऊन ते लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी विनंतीही करण्यात आली.
या रस्त्याचा वापर दररोज हजारो नागरिक, रुग्णवाहिका, शालेय वाहने तसेच इतर वाहनचालकांकडून केला जात असल्याने खड्डे व खराब रस्त्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
