सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी अमित शहा यांची भेट घडवून द्यावी; महाराष्ट्र एकीकरण समितीचे धनंजय महाडिक यांना निवेदन

सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी अमित शहा यांची भेट घडवून द्यावी; महाराष्ट्र एकीकरण समितीचे धनंजय महाडिक यांना निवेदन

बेळगाव : भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे १९ आणि २० जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, सीमाप्रश्नासंदर्भात निवेदन सादर करून चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला त्यांची भेट घडवून द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन खासदार तथा तज्ञ समितीचे सदस्य धनंजय महाडिक यांना देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आसाम आणि मेघालय राज्यांमधील सीमावाद सोडविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यशस्वी मध्यस्थी केली होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच २०२२ मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या संयुक्त बैठकीत सीमाभागातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले होते. यामध्ये दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांची समिती स्थापन करणे, सीमाभागातील परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवणे, परिस्थितीवर देखरेखीसाठी आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करणे आदी निर्णयांचा समावेश होता. मात्र, या निर्णयांची अद्याप प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सीमाभागातील सध्याची परिस्थिती आणि प्रलंबित प्रश्नांची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला अमित शहा यांची भेट घडवून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावर प्रतिक्रिया देताना खासदार धनंजय महाडिक यांनी अमित शहा यांची भेट घडवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, तसेच भविष्यात सीमाप्रश्न मार्गी लावण्यासाठीही प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले.

यावेळी भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नगरसेवक किरण नकाते उपस्थित होते.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने युवा समितीचे पदाधिकारी श्रीकांत कदम, संतोष कृष्णाचे, राजू कदम आणि आशिष कोचेरी यांनी निवेदन सादर केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × 2 =

error: Content is protected !!