बेळगाव : श्री संभवनाथ जिनालय जैन संघ, बेळगाव येथे आयोजित धर्मसभेत आचार्य राजरक्षितसूरीजी महाराज यांनी जीवन, मृत्यू आणि कर्म याविषयी अत्यंत मार्मिक मार्गदर्शन केले. मृत्यूचे स्मरण माणसाला सदाचाराच्या मार्गावर नेते आणि पापापासून दूर ठेवते, असे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रवचनात बोलताना आचार्य राजरक्षितसूरीजी म्हणाले की, सूर्याचा उदय आणि अस्त यांची वेळ निश्चित असते. रेल्वे गाडी येण्याची-जाण्याची वेळ ठरलेली असते. फुले कोमेजण्याची आणि दूध फाटण्याची वेळही ठरलेली असते. मात्र मृत्यू कधी येईल, हे कोणालाही माहीत नसते. तो बालपणात, तारुण्यात किंवा वृद्धापकाळात कोणत्याही क्षणी येऊ शकतो. मृत्यूला शुभ-अशुभ दिवस, गाव-परगाव किंवा श्रीमंत-गरीब असा कोणताही भेद नसतो.
“मृत्यू म्हणजे बाहेर गेलेला श्वास पुन्हा आत न येणे. जीवनाची मुदत वाढवता येत नाही, परंतु जीवन अधिक अर्थपूर्ण आणि सद्गुणी नक्कीच बनवता येते. मृत्यूचे स्मरण जितके प्रबळ होते, तितके पापाचे विस्मरण अधिक दृढ होते,” असे त्यांनी सांगितले.
महाभारतातील यक्ष-युधिष्ठिर संवादाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, यक्षराजाने विचारलेल्या ‘जगातील सर्वात मोठे आश्चर्य कोणते?’ या प्रश्नाला युधिष्ठिराने दिलेले उत्तर आजही तितकेच समर्पक आहे. “दररोज अनेक लोक मृत्यू पावतात, तरीही प्रत्येक माणूस आपण अमर असल्याप्रमाणे वागत असतो. यापेक्षा मोठे आश्चर्य दुसरे नाही,” असे त्यांनी नमूद केले.
मृत्यू सर्वांसाठी समान असल्याचे सांगताना त्यांनी संत-दुष्ट, श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरुष, सुशिक्षित-अशिक्षित असा कोणताही भेद मृत्यू करत नसल्याचे स्पष्ट केले. जन्म आणि मृत्यूच्या वेळी परिधान केलेल्या वस्त्रांना खिसे नसतात, तरीही माणूस आयुष्यभर संपत्ती साठवण्यात गुंतून राहतो. शेवटी माणसाबरोबर फक्त त्याचे पुण्य आणि पापच जातात, असे त्यांनी सांगितले.
पुढे त्यांनी कर्मसिद्धांत स्पष्ट करताना सांगितले की, जसा अभियंता आराखडा तयार करतो आणि त्यानुसार इमारत उभी राहते, त्याचप्रमाणे मनुष्याच्या कर्मांनुसार त्याचे भवितव्य घडत असते. चांगल्या कर्मांमुळे सद्गती मिळते, तर वाईट कर्मांमुळे दुर्गती प्राप्त होते. त्यामुळे शरीराने तप, संपत्तीने दान आणि सामर्थ्यानुसार समाजहिताची कार्ये करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पंडित श्री त्रिभुवनरत्न विजयजी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. दुःखाच्या प्रसंगी समता व समाधान राखावे आणि सुखाच्या काळात सद्बुद्धी जपावी, असे ते म्हणाले. “जो मनुष्य सुखातही परमेश्वराचे स्मरण करतो, त्याला दुःखाचा त्रास कमी होतो. तसेच दुःख आले तरी ते सहन करण्याची मानसिक ताकद त्याला प्राप्त होते,” असे त्यांनी सांगितले.
देव आणि गुरु यांच्याप्रती कधीही स्वार्थी भावना ठेवू नये. परमात्मा आणि सद्गुरूंच्या चरणी पूर्ण समर्पण असलेले मनच खऱ्या अर्थाने कल्याण आणि आध्यात्मिक प्रगती प्राप्त करू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
धर्मसभेला जैन समाजातील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
