बेळगाव : कन्नड भाषा सर्वांगीण विकास कायदा २०२२ च्या अंमलबजावणीमुळे मराठी भाषिकांच्या घटनात्मक व भाषिक अल्पसंख्याक हक्कांवर गदा आल्याचा आरोप करत २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततापूर्ण मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत १५ ते १९ जूनदरम्यान जनजागृती फेऱ्या काढण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे परवानगी मागण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात, कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सार्वजनिक फलकांवर पूर्वी मराठी भाषेचा वापर होत होता. मात्र कन्नड भाषा सर्वांगीण विकास कायदा लागू झाल्यानंतर सरकारी कार्यालयांतील मराठीचा वापर कमी करण्यात आल्याचा तसेच काही ठिकाणी मराठी फलक हटविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे मराठी भाषिक समाजाच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होत असून मराठी भाषिकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार असून त्यापूर्वी १५ ते १९ जूनदरम्यान शहरातील विविध भागांत सायंकाळी ६ ते ९ या वेळेत जनजागृती फेऱ्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या जनजागृती मोहिमेद्वारे कन्नड भाषा सर्वांगीण विकास कायद्याच्या तरतुदींविरोधात नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार असून, संबंधित फेऱ्यांसाठी पोलीस प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
