केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये ‘परिवर्तन’ व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन

केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये ‘परिवर्तन’ व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन

बेळगाव : उत्तर कर्नाटकातील मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्ती सेवांना नवी दिशा देणारे अत्याधुनिक ‘परिवर्तन रिहॅबिलिटेशन अँड डी-अॅडिक्शन सेंटर’ चे उद्घाटन येळ्ळूर रोडवरील केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटल येथे पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

केएलई संस्थेचे मानद अध्यक्ष आणि काहेरचे कुलगुरू डॉ. प्रभाकर कोरे यांनी मानसोपचार विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक करत समाजातील मानसिक आरोग्य व व्यसनमुक्तीसाठी अशा विशेष केंद्रांची गरज अधोरेखित केली. व्यसनाधीन व्यक्तींना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात बोलताना बेळगाव शहराचे पोलीस उपायुक्त यांनी वाढत्या मद्य व अमली पदार्थांच्या व्यसनामुळे व्यक्तींसह संपूर्ण कुटुंबावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगितले. व्यसनामुळे कौटुंबिक हिंसाचार, महिलांवरील अत्याचार आणि सामाजिक अस्थिरता वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

यूएसएम-केएलईचे संचालक डॉ. एच. बी. राजशेखर यांनी सांगितले की, या केंद्रातील ३० दिवसांच्या निवासी कार्यक्रमात मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून समुपदेशन, दैनंदिन मानसोपचार तपासणी, योग, ध्यान, २४ तास परिचारिका सेवा, पौष्टिक आहार, कौटुंबिक समुपदेशन आणि विविध उपचार पद्धतींचा समावेश करण्यात आला आहे.

रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन एन. यांनी सांगितले की, समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेच्या समस्येची दखल घेत हे केंद्र सुरू करण्यात आले असून, एकाच छताखाली उपचार, समुपदेशन, पुनर्वसन आणि जीवनकौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे.

डॉ. अँटोनियो कार्व्हालो यांनी केंद्रात अनुभवी मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांची बहुविद्याशाखीय टीम कार्यरत राहणार असल्याची माहिती दिली.

रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय कांबळे यांनी व्यसनाला नैतिक अपयश नव्हे तर उपचारयोग्य वैद्यकीय समस्या मानून सुरक्षित डिटॉक्सिफिकेशन, पुराव्यावर आधारित मानसोपचार, कौटुंबिक उपचार आणि दीर्घकालीन पुनर्वसन सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास वैद्यकीय व निमवैद्यकीय कर्मचारी, परिचारिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजीविनी राठोड यांनी केले, तर डॉ. अश्विनी पद्मशाली यांनी आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − fourteen =

error: Content is protected !!