बेळगाव, दि. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मच्छे येथील सरकारी मराठी प्राथमिक केंद्र शाळेत इयत्ता पहिलीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल दाते किशोर शिंदे, सुशांत देसाई आणि मल्हारी बाळेकुंद्री यांचा शाल, श्रीफळ व शाळेचे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वह्या तसेच इतर शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. मातृभाषेतील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक, सांस्कृतिक आणि सर्वांगीण विकास अधिक प्रभावीपणे होतो, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
नवीन प्रभारी मुख्याध्यापिका सौ. मुचंडी मॅडम यांनी दात्यांचे आभार मानताना समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेरलेकर मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन मोदी टीचर यांनी केले.
या कार्यक्रमास SDMC अध्यक्ष गजानन छपरे, अमोल लाड, परशराम कोलेकर, प्रशांत नांदोडकर, पूजा चौगुले, रूपा कनबरकर, पूजा लाड, दीपक सनदी, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
