बेळगाव : बेळगावचे मूळ रहिवासी आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी दिनेश ओऊळकर यांची भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (UCB) क्षेत्रासाठी आदर्श उपविधी (Model Bye-Laws) तयार करणाऱ्या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
RBI च्या १ जून २०२६ रोजीच्या आदेशानुसार, देशभरातील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांसाठी नवीन आदर्श उपविधी तयार करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. सहकारी बँकांमध्ये सुशासन, नियामक नियमांचे पालन आणि भांडवल उभारणीची प्रक्रिया अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ही समिती काम करणार आहे.
दिनेश ओऊळकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागात अतिरिक्त आयुक्त व विशेष निबंधक म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली असून सहकार क्षेत्रातील त्यांचा दीर्घ अनुभव लक्षात घेऊन RBI ने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
या समितीत बँकिंग आणि सहकार क्षेत्रातील अन्य तज्ज्ञांचाही समावेश असून समितीला पहिल्या बैठकीपासून तीन महिन्यांच्या आत मसुदा उपविधी सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
बेळगावच्या भूमीतून घडलेल्या व्यक्तीची देशातील सर्वोच्च बँकिंग नियामक संस्थेकडून झालेली ही नियुक्ती शहरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची ही मोठी दखल असल्याची भावना व्यक्त होत आहे.
#Belgav #BedhadakBelgav
