बेळगाव : गोवावेस येथील रामलिंगवाडी परिसरातील सिद्धिविनायक गणपती मंदिरात शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पिरणवाडी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष पिराजी मुचंडीकर होते.
यावेळी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, सुधाताई भातकांडे, संजय शिंदे, महादेव पाटील, गुणवंत पाटील, रुपाली नेसरकर , माजी नगरसेवक विजय भोसले, राजू बिरजे, रणजीत हावळनाचे, अभिजीत मजुकर, राजकुमार बोकडे, सागर पाटील तसेच बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीमध्ये १ जून रोजी हुतात्मा दिन गंभीरपणे व शिस्तबद्ध पद्धतीने पाळण्याबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच शहरातील मराठी भाषिक नागरिकांच्या जीवनमरणाशी निगडित विविध मूलभूत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरी सुविधा, ई-खाते व मालमत्ता नोंदणीतील अडचणी, उताऱ्यांचे प्रश्न, बिल्डिंग परवानग्या, पाणीपुरवठा आणि रस्त्यांची दुरवस्था यांसारख्या विषयांवर कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली.
याशिवाय, महाराष्ट्र एकीकरण समितीचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी विभागनिहाय संघटन उभारणी, कार्यकर्त्यांमधील समन्वय वाढविणे आणि मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रभावी लढा उभारण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीचा समारोप महादेव पाटील यांनी मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करून केला.
